मिशन बारामती सोबत नवीन राजकीय समीकरणांची नांदी- श्री चंद्रकांत दादा पाटील
राजकारणातील घराणेशाहीचा समारोप आणि नवीन राजकीय समीकरणांचा उदय यावर भर- महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांचे मुलाखतीतील प्रांजळ आणि परखड मत.
2019 च्या निवडणुकीच्या निकालासोबत महाराष्ट्राच्या राजकारणातील समीकरणे बदलतील आणि बरेच भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते ही समीकरणे बदलण्यास उत्सुक आहेत. निवडणुकांसाठी सर्वात चर्चिला गेलेला आणि सर्वाधिक लक्ष वेधून घेतलेला मतदार संघ बारामती हा आहे. महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी बारामती मतदारसंघांमध्ये अनेक प्रचार सभा घेऊन महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या परिस्थितीत, झी 24 तासने त्यांची मुलाखत घेतली आणि हा आमचा या मुलाखतीवरचा सविस्तर लेखाजोखा.
बीजेपी ने बारामती वर जास्त लक्ष का केंद्रित केले आहे?
श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी असे उत्तर दिले की बारामती मतदारसंघ मागची अनेक वर्षे एका कुटुंबाशी निगडित आहे आणि तुलनात्मक विचार केला तर राष्ट्रवादी काँग्रेसने बारामतीचा काही प्रमाणातच विकास साधला आहे. याच मतदार संघाचे अनेक विभाग आज उपेक्षित आहेत. भोर एमआयडीसी, बेरोजगार तरुण अशा अनेक समस्या या मतदारसंघात आहेत. त्याचप्रमाणे बीजेपीला बारामती मतदारसंघांमध्ये यश मिळणे ही साधी गोष्ट नसेल. त्यासाठी मेहनतीची आवश्यकता आहे. त्यामुळे बीजेपीने बारामती मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले आहे. त्यांनी असेही सांगितले, की या गोष्टी 2014 च्या निवडणुका पासूनच सुरु झाल्या आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये श्री. महादेव जानकर यांना खासदार सुप्रियाताई सुळे यांनी फक्त 76 हजार मतांच्या फरकाने पराभूत केले होते आणि हे आश्चर्यकारक होते. श्री. जानकर हा बारामतीसाठी नवीन चेहरा होता आणि तरीही त्यांनी इतका चांगला निकाल प्राप्त केला होता. त्यामुळे 2019 च्या निवडणुकांमध्ये बीजेपीच्या कमळासह आम्ही नवीन समीकरणे निवडणुकींच्या निकालांमध्ये अपेक्षित करीत आहोत.
बारामती मतदार संघासाठी वापरण्यात आलेले धोरण
महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी स्पष्ट केले की बारामती मतदारसंघांमध्ये पुण्यामधील खडकवासला या विभागाचा समावेश होतो आणि त्याचा आम्हाला निश्चित फायदा मिळेल, जर आम्ही खडकवासला मधून अधिक मताधिक्य मिळवू शकलो आणि त्याचवेळी सुप्रियाताई सुळे यांना बारामतीतून काही प्रमाणात मते कमी करू शकलो तर निश्चितच नवीन समीकरणे पाहायला मिळतील.
बारामतीचा विकास आणि पवार कुटुंबीयांचे योगदान
माननीय पंतप्रधान श्री.नरेंद्र मोदी आणि श्री. अरुण जेटली यांच्या बारामतीला भेट आणि बारामतीच्या विकासाची प्रशंसा या प्रश्नाला उत्तर देताना महसूल मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी असा जबाब दिला की बीजेपी नेहमी विरोधकांच्याही चांगल्या गोष्टींना स्तुती करून मान्यता देते. आम्ही कधीच बारामतीच्या विकासाला आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या योगदानाला नाकारले नाही. परंतु वस्तुस्थिती अशी आहे की बारामती मतदार संघाचा अंशतः विकास साधण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालेले आहे आणि यामध्येही श्री. आप्पासाहेब पवार यांचा मोठा वाटा आहे. आजही बरेच कार्य बाकी आहे, ज्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आणि अन्य समस्यांचा समावेश आहे. तसेच, लोकशाहीमध्ये एकाच घराण्याकडे राजकारणाच्या सूत्रांची एकाधिकारशाही का असावी? जेव्हा श्री. चंद्रकांत दादा पाटील यांना त्यांच्या बदललेल्या स्वभावाबद्दल आणि आक्रमक वृत्ती बद्दल विचारले, तेव्हा त्यांनी सांगितले की राजकारणात नेत्यांना वेगवेगळे भूमिका पार पाडाव्या लागतात. आता मला आक्रमक भूमिका घेणे गरजेचे आहे. कारण तरच बारामती मतदारसंघात बीजेपीला यश मिळू शकेल. तसेच गमतीने ते असेही म्हणाले की राज ठाकरे, हर्षवर्धन पाटील इत्यादींना मी या पद्धतीने बोलू शकत नाही कारण त्यांचे आगामी निवडणुकीतील अस्तित्व तितके पूरक वाटत नाही. परंतु श्री. शरद पवार हे आदरणीय आहेत आणि माझे मित्रही आहेत. मला अशी आक्रमक वृत्ती दाखवावी लागते, कारण आम्हाला राजकारणातील घराणेशाहीचा समारोप करायचा आहे. तसेच महाराष्ट्राच्या इतिहासातील इष्ट नसणाऱ्या राजकारणी वृत्तींचा ही समाचार घ्यायचा आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की श्री. अजित पवार यांना हर्षवर्धन पाटलांच्या घरी जावे लागले. त्यांना हे करण्याची गरज पडली कारण पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने हर्षवर्धन पाटील यांना नेहमीच संकटात टाकले आहे आणि आता त्यांना मनवायची वेळ आली आहे.
धनगर जातीच्या आरक्षणासंदर्भातील विचार
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी असा दावा केला की सध्याचे सरकार हे धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा यशस्वीपणे मांडू शकले आहे. न्यायालयीन निकाल येईपर्यंत धनगर समाजाला आदिवासींच्या सर्व सुविधा प्राप्त होणार आहेत, ज्यामध्ये आश्रम शाळा, हॉस्टेल, शाळांची फी यांचा समावेश असेल. त्याचप्रमाणे सोलापूर विद्यापीठाला अहिल्याबाई होळकर विद्यापीठ असे नामकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण होत आलेली आहे. त्यामुळे धनगर समाज नेहमीच बीजेपीला पाठिंबा देईल.
निवडणुका आणि त्यांचे निकाल यासंदर्भातील एकत्रित चित्र
श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या मते एक गोष्ट अतिशय स्पष्ट आहे की पश्चिम महाराष्ट्राच्या 10 जागा बीजेपी- शिवसेना युतीलाच मिळणार आहेत. त्यांनी श्री. पार्थ पवार यांच्या बद्दल सहानुभूती देखील व्यक्त केले कारण ते निश्चित आगामी निवडणुकांमध्ये पराभूत होणार आहेत. देशपातळीवर त्यांना विश्वास आहे की 375 जागा बीजेपी आणि मित्रपक्षांना मिळतील. त्यामुळे माननीय श्री. नरेंद्र मोदी हे निश्चित देशाचे पंतप्रधान परत असणार आहेत.
बीजेपी आणि भविष्य
पक्षात इतर सदस्यांचा होणारा प्रवेश, प्रचारसभांमध्ये होणारी हिंसा आणि अशा विविध गोष्टींमुळे बीजेपीवर होत असणारी टीका यावर श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी असं उत्तर दिले की काही वेळा अशा गोष्टी होतात, परंतु पक्षात अशा लोकांच्या प्रवेशाने पक्षाची तत्वे आणि नीतिमत्ता यावर निश्चितच परिणाम होणार नाही. त्यांनी असे सांगितले की जिथे अनुचित गोष्टी झाल्या आहेत त्यावर पक्ष निश्चितच कारवाई करेल. त्याचवेळी ते असे म्हणाले की पक्षांमध्ये अनेक मुत्सद्दी राजकारणी इतर पक्षामधून प्रवेश घेत आहेत. कारण त्यांना बीजेपी मध्ये चांगले भविष्य, तत्त्वनिष्ठता आणि समाजासाठी कार्य करण्याची संधी दिसून येत आहे.
बीजेपी कार्यकर्ते, त्यांना असणारा आत्मविश्वास आणि बीजेपीच्या प्रख्यात नेत्यांचे मार्गदर्शन आणि सहभाग यामुळे येत्या निवडणुकांमध्ये बीजेपीच्या मोहिमा निश्चितच महत्व प्राप्त करत आहेत. या मोहिमांचे योगदान महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे बदलण्यास उपयुक्त ठरेल.

Comments
Post a Comment