चंद्रकांत दादा पाटील यांनी बीजेपी उमेदवाराच्या विजयासाठी मुळशी येथे झालेली प्रचार सभा
महसूल मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी प्रचार सभेमध्ये विरोधकांवर हल्ला चढवून बीजेपी सरकारच्या विविध योजना आणि निर्णयांची माहिती दिली.
खूप वेळा परिस्थितीमुळे माणसांना वेगवेगळ्या भूमिका पार पाडाव्या लागतात आणि परिस्थितीची गरज म्हणून लोक स्वतःला बदलतात. भारतीय जनता पार्टीच्या आगामी निवडणुकांमधील यशासाठी महसूल आणि कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांच्या बाबतीतही असेच काही घडत आहे. अतिशय शांत आणि गंभीर व्यक्तिमत्व असणारे दादा पाटील आजकाल अतिशय आक्रमक होताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी मुळशी येथे एक प्रचार सभेला उपस्थिती लावली आणि त्या वेळी बीजेपी सरकारच्या वेगवेगळ्या योजना, कार्ये आणि निर्णयांची माहिती लोकांना करून दिली तसेच काँग्रेस सरकार वरही टीका केली.
महसूल मंत्र्यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या प्रभावशाली नेतृत्व आणि वेगवेगळ्या योजना आणि निर्णयांची स्तुती करून केली. त्यांनी 2014 मध्ये असणाऱ्या गुजरात पॅटर्न या परिस्थितीची आठवण करून दिली. तसेच त्यांनी हेही नमूद केले की गुजरात पॅटर्न हा संपूर्ण देशभरात स्तुत्य होता. पाच वर्षात त्यांनी देशामध्ये वेगवेगळ्या घटकांसाठी वेगवेगळ्या योजना उपलब्ध करून दिल्या आहेत, यामध्ये शेतकरी,कामगार, स्त्रिया, विद्यार्थी यांचा समावेश आहे. देशातील प्रत्येक खेडेगावाला या योजनांचा काहीना काही प्रकारे उपयोग झाला आहे. ताजे उदाहरण म्हणून त्यांनी आयुष्यमान भारत या योजनेचा उल्लेख केला. या योजनेमुळे पाच लाख रुपये इतके मूल्य असणारे आरोग्यविषयक फायदे, औषधे अथवा उपचार खर्च पात्र असणाऱ्या कुटुंबाला आता मिळू शकतील.
महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी अजून एक स्वयंसिद्ध उदाहरण उज्वला योजनेचे दिले. त्यांनी असे सांगितले की देशाचे पंतप्रधान माननीय श्री. नरेंद्र मोदीजीयांना स्त्रियांच्या समस्या समजणार नाहीत, ते त्या विषयी अनभिज्ञ राहतील असा आरोप केला होता आणि याचे मूळ त्यांच्या वैवाहिक आयुष्याची निगडित होते. परंतु मोदीजींनी असे सिद्ध केले की स्त्रियांच्या समस्यांविषयी ते किती जागृत आहेत. त्यांनी खेड्यातील महिलांना मोफत गॅस सुविधा उपलब्ध करून दिली आणि ज्यामुळे महिलांच्या सुविधा आणि आरोग्य विषयक जाणिवा यामध्ये भर पडलेली आहे. आतापर्यंत सात करोड महिलांना मोफत गॅस जोडणीचा फायदा झाला आहे, तसेच 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होणार आहेत तोपर्यंत श्री नरेंद्र मोदीजी यांची अशी योजना आहे की भारतातील प्रत्येक महिलेकडे स्वतंत्र गॅस सुविधा उपलब्ध झालेली असेल आणि चुलीवर स्वयंपाक करण्याची गरज पडणार नाही. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी महिलांशी निगडीत दुसरी योजना जिच्यामुळे गरोदर महिलांना फायदा झाला आहे आणि त्यांना विश्रांती, औषधे आणि आरोग्यदायी अन्न उपलब्ध होऊ शकेल हीदेखील स्पष्ट केली. तसेच त्यांनी असंघटित क्षेत्रातील नोकरांसाठी व कामगारांसाठी निर्माण करण्यात आलेल्या निवृत्ती वेतन योजनांबद्दल भाष्य केले. थोडक्यात श्री. मोदी यांनी बदलत्या आणि विकसित भारताची व्याख्या आणि चेहरामोहरा बदलून टाकला आहे.
अनुभवी आणि तज्ञ कृषि मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी खिलाडूवृत्तीने तरुण आणि हुशार माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची देखील स्तुती केली. ते असे म्हणाले की 2014 च्या बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासात एका नवीन नेतृत्वाचा उदय झाला. या तरुण आणि हुशार व्यक्तीने महाराष्ट्राच्या विकासासाठी नवीन दिशा देण्याचे आश्वासन दिले होते आणि त्यांच्या कर्तृत्वाने त्याने ते सिद्ध केले. आज आमच्या कार्यकाळाची पाच वर्षे पूर्ण होत असताना जवळपास सर्व धरणांचे प्रकल्प,पाणीपुरवठ्याचे प्रकल्प आणि वाहतूक रस्ते यांची कामे प्रगतीपथावर आहेत किंवा पूर्णत्वास गेलेली आहेत. माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीमध्ये 2 दोन मोठे मैलाचे दगड पार झाले आहेत ज्यामध्ये मराठा आरक्षण प्रक्रियेचा समावेश होतो. ही 1968 पासून प्रलंबित असणारी प्रक्रिया आमच्या सरकारने अतिशय उत्तम रीतीने हाताळून यश मिळवले आहे. तीन महिन्यांमध्ये न्यायालय निकाल जाहीर होतील आणि 16 टक्के आरक्षण शिक्षण व नोकरीसाठी मराठा समाजाला लागू झाले आहे.
फडणवीस सरकारचे दुसरे मोठे यश धनगर समाज आरक्षण प्रक्रियेमध्ये समाविष्ट आहे. धनगर समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने टी आय एस एस अहवालाची मदत घेतली आणि धनगर आणि धनगड या दोन समाजांमधील असणारा गोंधळ चुकीचा असल्याचे स्पष्ट केले. यापूर्वी काँग्रेस सरकारने अशा पद्धतीचा पद्धतशीर दृष्टिकोन धनगर समाजाच्या आरक्षणासाठी कधीच वापरला नव्हता. न्यायालयीन अंतिम निकाल हाती येईपर्यंत महाराष्ट्र शासन धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या सर्व सुविधा देण्यास बांधील आहे. यामध्ये आश्रम शाळा, ट्युशन फी, वसतिगृहे इत्यादींचा समावेश होतो. सद्य सरकारने या दोन गोष्टींमध्ये मिळवलेले यश कोणीच भविष्यात विसरू शकत नाही.
प्रचार सभेमध्ये बीजेपीला मत द्या असे आवाहन करताना श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढच्या काही वर्षांच्या योजना आणि त्यांचे भविष्य याविषयी भाष्य केले. त्यांनी असे मत मांडले की सर्व कामांची पूर्वतयारी आता झालेली आहे आणि उर्वरित कार्य, यामध्ये योजनांची योग्य रीतीने अंमलबजावणी व त्याचा फायदा शेतकरी, मजूर, स्त्रिया यांना होऊ शकेल यावर भर दिला जाईल. त्यांनी असेही सांगितले की बीजेपी सरकारला जर दोन तृतीयांश मतांनी यश मिळाले तर देशाच्या सुरक्षेसाठी काही निर्णय घेतले जातील. हे निर्णय संविधानाच्या कलम 370 शी निगडीत असतील. ज्याची दुरुस्ती अथवा रद्द करण्याची प्रक्रिया हाती घेतली जाईल आणि त्यामुळे भारतीयांना काश्मीरमध्ये व्यवसाय, नोकरी अथवा जमिनींचे व्यवहार सहज रीतीने करता येतील.
भाषणाचा समारोप करताना त्यांनी लोकांना असे आवाहन केले की बीजेपीच्या उमेदवार सौ. कांचनताई कुल यांना विजयी करा आणि मी आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस आपणाला राहिलेल्या कामांच्या पूर्ततेची ग्वाही देतो.
Comments
Post a Comment