माढा विजय संकल्प सभा
माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांनी माढा मतदार संघातील अकलूज येथे भव्य प्रचार सभेला उपस्थिती लावली आणि काँग्रेस सरकारवर जोरदार हल्ला केला तसेच बीजेपी सरकारच्या विविध उपक्रमांची आणि कामांची माहिती दिली.
आगामी निवडणुकांच्या तयारीसाठी बीजेपी खूप मोठ्या प्रमाणात सज्ज आहे. त्यांनी निवडणूक मोहीम, प्रचार सभा,मुलाखती, विजय संकल्प सभा, रॅली अशा विविध धोरणांचा उपयोग विजयासाठी केला आहे. अकलूज येथे माढा मतदारसंघ अंतर्गत विजय संकल्प सभेचे आयोजन केले होते आणि ही सभा लोक आणि पत्रकार यांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली. याचे मुख्य कारण माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती व भाषण हे होते. बीजेपी वरिष्ठांच्या भाषणातून आगामी निवडणुकांत बीजेपीला मिळणाऱ्या यशाची झलक दिसत आहे. तसेच पुन्हा नरेंद्र-देवेंद्र मिशन महाराष्ट्रात लागू होईल अशी शक्यता वाटते.
सभेच्या सुरुवातीला तज्ञ आणि अनुभवी बीजेपी नेते श्री, विजयसिंह मोहिते-पाटील यांचा माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांनी वयाची 75 वर्षे पूर्ण केली तसेच पक्ष आणि समाजकार्यासाठी दिलेल्या योगदानासाठी हा सत्कार करण्यात आला.
माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी छोट्या व प्रभावी भाषणात काही मुद्दे मांडले. त्यांनी जनतेच्या भरघोस पाठिंब्यासाठी प्रशंसा केली तसेच या दृष्टिकोनामुळेच श्री. शरद पवारांनी निवडणुकांमधून माघार घेतली असावी असे मत व्यक्त केले. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारने लागू केलेल्या विविध योजनांचा पश्चिम महाराष्ट्राला कसा फायदा झाला यावरही भाष्य केले. यामध्ये त्यांनी विविध जलसंधारण योजना, धरणांचे प्रकल्प, कालव्यांची कामे यांचा दुष्काळी असणाऱ्या सोलापूर आणि सातारा जिल्ह्यांना कसा फायदा झाला हे स्पष्ट केले. तसेच त्यांनी साखरेला भाव निश्चिती केल्याबद्दल आणि वाढीव एफ. आर. पी. साठी केंद्र शासनाची स्तुती केली. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडे केंद्र सरकारची उत्तमोत्तम पदे असतानाही त्यांनी कृषी आणि दुष्काळासाठी पश्चिम महाराष्ट्रात काहीच केले नाही असा खेद व्यक्त केला.
या सभेचे मुख्य आकर्षण हे माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांची उपस्थिती व भाषण हे होते. त्यांनी भाषणाची सुरुवात मराठी भाषेतून करून लोकांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी सध्या सुरू असलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचे नुकसान झाले आहे असे शेतकरी आणि बळी पडलेले नागरिक यांच्यासाठी आवश्यक त्या सुविधा आणि मदत ताबडतोब पुरवण्यात येतील असा विश्वास दिला. तसेच त्यांनी श्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या भरीव योगदानासाठी आभार मानले.
भाषणाच्या सुरुवातीलाच मिश्किल पद्धतीने त्यांनी असे मत व्यक्त केले की आता मला समजले की श्री. शरद पवार यांनी निवडणुकांमधून माघार का घेतली. पुढे ते असेही म्हणाले की श्री. शरद पवार हे खिलाडूवृत्तीचे आहेत आणि तरीही ते माघार घेतात म्हणजे नक्कीच त्यांचा पक्ष किंवा कुटुंबाला या मतदारसंघात धोका आहे याची जाणीव त्यांना झालेली असणार.
नंतर त्यांनी लोकांना असे आवाहन केले की तुम्ही शैक्षणिक सुविधा, सुरक्षेसाठी लागणाऱ्या सुविधा, आरोग्यविषयक सुविधा यासाठी अतिशय काळजीपूर्वक निवड करता मग इतक्या प्रचंड मोठ्या देशाला योग्य नेत्यांच्या हाती सोपवण्यासाठी तुम्हाला निश्चितच खूप काळजीने आणि योग्य नेत्यांची निवड होणे आवश्यक वाटत नाही का? पाच वर्षे आपण सर्वांनी बीजेपी सरकारचे कार्य पाहिले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींसह समाजातल्या प्रत्येक घटकांसाठी भरीव कार्य केले आहे. पुढे ते असेही म्हणाले की भारतीय लष्कराच्या सर्जिकल स्ट्राइक आणि इतर मोहिमांमधून आपण दहशतवाद्यांना धडा शिकवला. काँग्रेस सरकारच्या कारकिर्दीत मुंबई शहरामध्ये दहशतवादाचा उच्चांक होता, तरीही तत्कालीन सरकारने कोणतीही कृती केली नव्हती. त्यांनी जे राजकीय पक्ष भारतीय लष्कराच्या सर्जिकल अटॅक सारख्या मोहिमांवर शंका घेतात त्यांचा समाचार घेण्यास आणि त्यांना योग्य उत्तर देण्यास मी समर्थ आहे असा विश्वास दिला.
पुढे ते असे म्हणाले की यावेळी पहिल्यांदाच निवडणुकांच्या इतिहासात जनता इतक्या उत्साहाने सहभागी होत आहे आणि जनताच भारतीय जनता पक्षाला मते देऊन सरकार पुन्हा एकदा पक्षाच्या आणि मोदी सरकारच्या हाती सोपवण्यास उत्सुक आहे.
भाषणाच्या पुढील भागामध्ये त्यांनी सरकारच्या विविध कार्याबद्दल विचार व्यक्त केले. त्यांनी असे नमूद केले की बीजेपी कारकिर्दीत कोणताच घोटाळा दृष्टिक्षेपात येत नाही आणि आणि याची तुलना तुम्ही काँग्रेसच्या कारकिर्दीबरोबर करू शकता. बीजेपी सरकार हे खोटे बोलणार्यांना आणि खोटी कृती करणाऱ्यांना योग्य उत्तर देण्यास सक्षम आहे. त्यांनी महागाई दर कमी करून सर्वांची जीवनशैली उंचावण्यासाठी प्रयत्न केल्याचे स्पष्ट केले.
श्री. मोदी यांनी या मुद्द्याकडे ही लक्ष वेधून घेतले की सध्या कॉंग्रेसचे सर्व नेते फक्त ‘मोदी हटाव’ एवढ्याच गोष्टीबद्दल बोलताना दिसतात. ते त्यांच्या आधीच्या कोणत्याच कार्याबद्दल किंवा भविष्यातील कोणत्याच योजनांबद्दल काहीच बोलत नाहीत. त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या खालच्या पातळीवरील चौकीदार आणि जातीयवादी टीकेची देखील आठवण करून दिली. तसेच असा इशाराही दिला की मी माझ्या वरील टीका सहन करू शकेल, परंतु अशा पद्धतीची टीका लोकांवर झालेली मी कधीच सहन करणार नाही.
आज त्यांनी सभेमध्ये शरद पवार यांनी उपस्थित केलेल्या परिवार या मुद्द्याला ही उत्तर दिले. श्री. मोदी यांच्या मते माझा परिवार हा मर्यादित नसून तो अनेक महान व्यक्तींच्या विचारधारेने आणि प्रेरणेने बनलेला आहे. ज्यामध्ये भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चाफेकर बंधू, महात्मा फुले, डॉक्टर आंबेडकर, वीर सावरकर यांचा समावेश होतो. तसेच त्यांनी असा सल्लाही दिला की श्री. पवार यांनी त्यांचे राजकीय गुरू स्वर्गीय श्री. यशवंतराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घेतली असती तर बरे झाले असते.
भाषणाचा समारोप करताना त्यांनी सरकारच्या विविध योजना आणि निर्णयांची थोडक्यात माहिती दिली. नुकत्याच जाहीर झालेल्या आयुष्मान भारत योजनेचा त्यांनी उल्लेख केला. या योजनेमुळे अनेक गरीब कुटुंबीयांना वैद्यकीय सुविधा आणि औषधे यासाठी सरकारकडून मदत मिळू शकेल. त्यांनी साखरेवरील आयात-निर्यात धोरणांचा फेरविचार व या निर्णयांचा शेतकऱ्यांना झालेला फायदा यावरही भाष्य केले. तसेच ते हेही म्हणाले की आम्ही फक्त उसापासून साखरेची निर्मिती इतकाच विचार करत नसून, इथेनॉल आणि जैवइंधन निर्मितीचीही प्रक्रिया सुरू झाली आहे. भारताचे कृषिमंत्री असणारे श्री. शरद पवार या गोष्टी पूर्वीच करू शकले असते, परंतु मी भाग्यवान आहे की ही संधी मला मिळाली. त्यांनी पुढे असाही विश्वास व्यक्त केला की सरकारच्या पुढील कार्यकाळामध्ये पाण्यासाठी आणि पाण्याच्या कमतरतेच्या विविध समस्या सोडवण्यासाठी स्वतंत्र मंत्रालयाची स्थापना करण्यात येईल.
शेवटी त्यांनी बीजेपी उमेदवारांना मत देऊन मोदी सरकारला येत्या निवडणुकीत विजयी करा असे आवाहन लोकांना केले.
Comments
Post a Comment