कृषी क्षेत्रातील सर्व घटकांना त्यांचे कार्य एक मिशन समजून करण्याची गरज
कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी कृषी संशोधन क्षेत्राची बैठक ‘जॉईंट अग्रेस्को’ला राहुरी कृषी विद्यापीठांमध्ये उपस्थिती लावली. या बैठकीदरम्यान कृषी मंत्री माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की जर तुम्हाला शेतकऱ्यांना सुखी, समाधानी, आणि सुरक्षित झालेले पाहायचे असेल तर कृषी क्षेत्रातील प्रत्येक घटकाने त्यांचे कार्य एक महत्त्वाचे मिशन आहे असे समजून केले पाहिजे.
माननीय कृषी मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यांनी कृषी संशोधन आणि विकास समितीच्या 47 व्या बैठकीच्या समारोप समारंभाला उपस्थिती लावली. ही बैठक महाराष्ट्र कृषी शिक्षण आणि संशोधन परिषद पुणे आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी कृषी विद्यापीठ यांनी आयोजित केली होती. माननीय मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील या बैठकीदरम्यान प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमाला अध्यक्ष डॉ. के.पी. विश्वनाथ आणि उर्वरित विद्यापीठांचे कुलगुरू डॉ. विलास भाले, डॉ. अशोक ढवण, डॉ संजय सावंत उपस्थित होते. बैठकीच्या इतर अतिथी मध्ये श्री. सचिन डवले, श्री. महेंद्र वारभुवन, डॉ. शरद गडाख आणि डॉ. हरिहर कौसडीकर यांचा समावेश होता.
या बैठकीदरम्यान माननीय महसूल मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील म्हणाले की कृषी क्षेत्रासाठी कार्यरत असणाऱ्या प्रत्येक घटकाने त्यांचे कार्य एक महत्त्वाचे मिशन समजून केले पाहिजे, यामुळे भारतातील शेतकरी आनंदी,समाधानी, आणि सुरक्षित होण्यास मदत होईल. शास्त्रज्ञ, अधिकारी या सर्वांना या विषयांसाठी एकत्रितपणे काम करण्याची गरज आहे. तसेच कृषी क्षेत्रासाठी विविध कृषी विद्यापीठांची भूमिकाही महत्त्वाची आहे, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यास मदत झालेली आहे. या बैठकीदरम्यान महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या 13 बियाणे प्रजाती, 17 यंत्रणा आणि 189 सूचनांना मान्यता देण्यात आली.
माननीय मंत्री श्री. चंद्रकांत दादा पाटील यावेळी म्हणाले की फक्त पारंपरिक शेती पद्धती अधिक उत्पन्न प्राप्तीसाठी योग्य नाही. यामागे अनेक कारणे आहेत, शेतकऱ्यांना त्यांच्या पेरणीचे निर्णय अचूक पद्धतीने घेता येत नाही. तसेच जेव्हा विक्रमी उत्पादन होते तेव्हा आपली बाजार पद्धती त्याला न्याय देऊ शकत नाही. यावर गट शेती पद्धती चांगली उपायोजना असून त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न चांगल्या प्रमाणात वाढू शकेल.
माननीय श्री. एकनाथ डवले म्हणाले की सर्व कृषी विद्यापीठांमध्ये संशोधन ही अखंड प्रक्रिया सुरू असते. कृषिविद्यापीठांना पुढील पाच ते दहा वर्षांचा आराखडा निश्चित करून त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी संशोधन केले पाहिजे. तसेच अशा पद्धतीच्या यंत्रांची निर्मिती केली पाहिजे त्यामुळे कमीत कमी वेळामध्ये काम होऊन शेतकऱ्यांना मदत होऊ शकेल. माननीय श्री. महेंद्र वारभुवन म्हणाले की महाराष्ट्रातील सर्व कृषी विद्यापीठे सध्या उत्कृष्टपणे कार्य करीत आहेत. त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा शेतकऱ्यांना निश्चितच फायदा होत आहे. तसेच जे इतर घटक अथवा व्यक्ती शेतकऱ्यांसाठी काही संशोधन अथवा कृती करीत असतील तर त्यांच्या कार्याला प्रोत्साहन दिले पाहिजे. कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले की सर्व कृषी विद्यापीठांची ही जबाबदारी आहे की त्यांनी शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत केली पाहिजे. असे निरीक्षण आहे की कृषी विद्यापीठाच्या संशोधनाचा शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आणि त्यामुळे अधिक उत्पादन आणि प्राप्ती लाभलेली आहे. 2022 पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा आपला इरादा आहे.
माननीय कृषी मंत्री श्री.चंद्रकांत दादा पाटील यांनी समारोप समारंभादरम्यान केलेले भाषण कृषी क्षेत्रातील सर्वच घटकांना प्रोत्साहित करणारे होते. त्यांचे सर्व घटकांनी एकत्रित येऊन एक मिशन समजून कृषी क्षेत्रासाठी कार्य करावे हे आवाहन निश्चितच स्वागतार्ह आहे आणि याचा फायदा संपूर्ण कृषी क्षेत्राला सकारात्मक रीतीने होईल. माननीय श्री. चंद्रकांत दादा पाटील नेहमीच नावीन्यपूर्ण पद्धती आणि तंत्रावर भर देतात. गट निहाय शेतीची पद्धती जर यशस्वीपणे अंमलबजावणी करून वापरली गेली तर निश्चितच कृषी क्षेत्रामध्ये क्रांती होऊ शकेल.

Comments
Post a Comment